मुंबई : काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ४ ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यसभेच्या या जागेसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना मतदार करता येणार का, असा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाच्या या १२ निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. या १२ निलंबित आमदारांना विधान भवनात प्रवेश करण्यास मनाई असल्याने त्यांच्यासाठी विधान भवनाच्या आवारात स्वतंत्र मतदान केंद्र उभारले जाईल. या आमदारांसाठी स्वतंत्र मतपेटी आणि मतपत्रिका असतील, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी चार या वेळेत या निलंबित आमदारांना मतदान करता येईल. त्यांच्या मतपत्रिका नंतर मुख्य मतदान केंद्रातील मतपत्रिकांमध्ये मिसळल्या जातील. दरम्यान, राज्यसभेच्या या एका जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यावर लगेच संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.