मुंबई : राज्य सरकारने दोन लस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी ११ ऑगस्टपासून आजपर्यंत एक लाख २१ हजार १९७ नागरिकांनी रेल्वेचे मासिक पास काढले आहेत. मध्य रेल्वेवर ७९,००८ जणांनी तर पश्चिम रेल्वेवर ४२,१८९ जणांनी पास काढले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या डोंबिवली, तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात पास काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, अशी आकडेवारी रेल्वे विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वेकडून अतिरिक्त लोकल फेऱ्या
दरम्यान, प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सोमवारपासून अतिरिक्त लोकल फेर्या वाढवण्यात आल्या आहेत. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर लोकलच्या १,६१२ फेऱ्या धावत आहेत. त्या वाढवून १,६८६ फेऱ्या दर दिवशी चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या १,२०१ लोकल फेऱ्या वाढवून १,३०० करण्यात आल्या आहेत.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com