◼️ महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, दिल्लीचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत
◼️ महाराष्ट्र पुरुषांमध्ये प. बंगाल तर महिलांमध्ये पंजाब विरुद्ध उपउपांत्य फेरीत लढणार
जबलपूर : ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे, विमान प्राधिकरण बाद फेरीत फेरीत पोहचले आहेत. काल झालेल्या पावसामुळे सर्व सामने बंदिस्त असलेल्या एकाच मॅटवरील क्रीडांगणावर सामने सुरू आहेत. पावसामुळे साखळी सामान्यांनंतर होणारे उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने रद्द करून प्रत्येक गटातील विजेता संघ थेट उपउपांत्य फेरीत खेळेल. त्यामुळे पुरुषांमध्ये महाराष्ट्र वि. प. बंगाल, रेल्वे वि. विदर्भ, कर्नाटक वि. केरळ व कोल्हापूर वि. दिल्ली तर महिलांमध्ये महाराष्ट्र वि पंजाब, विमान प्राधिकरण वि. दिल्ली, हरयाणा वि. कोल्हापूर, व कर्नाटक वि ओरिसा असे सामने उपउपांत्य फेरीत रंगतील.
पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने तेलंगणाचा १५-०६ असा ९ गुणांनी धुव्वा उडवत उपउपांत्य फेरीतले स्थान पक्के केले. महाराष्ट्राच्या गजानन शेंगाळ (२:००, २:३० मि. संरक्षण), मिलिंद कुरपे (५ गडी), अक्षय भांगरे (२:२०, २:०० मि. संरक्षण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलत महाराष्ट्राला सहज विजय मिळवून दिला. तर तेलंगणाच्या जीविथ रावने (२:०० मि. संरक्षण व १ गडी) एकहाती लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर सहकार्यांची साथ न मिळाल्याने मोठा पराभव पत्करावा लागला.
पुरुषांच्या सामन्यात रेल्वेने छत्तीसगडचा १३-०९ असा एक डाव ४ गुणांनी धुव्वा उडवला. रेल्वेच्या अक्षय गणपुले, अमित पाटील, शिजेश यांनी विजयात मोलाची कामगिरी करत आरामात विजय मिळवून दिला तर छत्तीसगडच्या गजेंद्रने चांगला खेळ केला.
महिलांच्या सामान्यत महाराष्ट्राने विदर्भाचा १०-०४ असा एक डाव ६ गुणांनी पराभव करत गटविजेते होत थेट उपउपांत्य फेरीत स्थान मिळवले. महाराष्ट्राच्या रुपाली बडे (२:५० मि. संरक्षण), अपेक्षा सुतार (३:०० मि. संरक्षण व १ बळी), आरती कांबळे (३:२० मि. संरक्षण), स्नेहल जाधव (२:०० मि. संरक्षण व २ बळी) प्रियांका इंगळे (नाबाद १:४० मि. संरक्षण व २ बळी) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीने मोठा विजय साजरा करता आला. तर पराभूत विदर्भाच्या ऐश्वर्या धोकेने (१:४० मि. संरक्षण) एकाकी लढत दिली.
महिलांच्या दुसर्या एका सामन्यात कोल्हापूरने प. बंगालचा ६-०५ असा ४:३० मि. राखून एक गुणाने विजय मिळवला. कोल्हापूरच्या स्नेहा (३:००, ३:१० मि. संरक्षण), ऋतुजा (२:१० मि. संरक्षण), वैष्णवी (२:४०, नाबाद १:५० मि. संरक्षण) यांच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. तर पराभूत प. बंगालच्या नांक्षिता रॉयने (१:४०, १:५० मि. संरक्षण) जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.
इतर निकाल
पुरुष: कर्नाटकने तामीळनाडूचा १७-०८, विदर्भाने ओरिसाचा १०-१० (बरोबरी), दिल्लीने आंध्रप्रदेशचा १३-०७, प. बंगालने मध्य भारतचा ११-१० असा पराभव केला.
महिला: कर्नाटकने तामीळनाडूवर १२-०३, ओरिसाने राजस्थानवर १२-०४, दिल्लीने गुजरातवर १०-०८, हरयाणाने आंध्रप्रदेशवर ८-०४ विजय मिळवला.