मुंबई : मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाला एकूण 3.65 गुण मिळाले आहेत. हा दर्जा मिळवण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठांच्या एकूण तुलनेत सर्वाधिक गुण मुंबई विद्यापीठाने मिळवले आहेत. नॅककडून आज अधिकृतरित्या करण्यात आल्यानंतर विद्यापीठातील व्यवस्थापन सदस्य, सिनेट सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी 2012 साली 3 वर्षासाठी NAAC मूल्यांकन झाले होते. त्यानंतर विद्यापीठाचे NAAC मूल्यांकन विविध कारणास्तव रखडले होते. आता हे NAAC मूल्यांकन पुढील सहा वर्षासाठी असणार असल्याची माहिती आहे.
मुंबई विद्यापीठाला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा सन्मान मिळावा आणि त्यामुळे नॅकचा दर्जा मिळावा म्हणून विद्यापीठाने यासाठीची जोरदार तयारी केली होती. विद्यापीठातील एकूण शैक्षणिक वातावरण, विकास कामे, संशोधन आणि विद्यापीठातील असलेल्या सोयी सुविधा,शैक्षणिक विकास आणि उद्योग, व्यवसायपूरक नवीन अभ्यासक्रम त्यामध्ये सागरी व्यवसाय शिक्षण, आभासी शिक्षण तसेच संशोधनात्मक प्रगती या सगळ्याच सादरीकरण मुंबई विद्यापीठाकडून नॅक कमिटीसमोर करण्यात आलं होतं. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी त्यासोबतच सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या या दर्जाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाची मुदत 20 एप्रिल 2017 रोजी संपली होती. गेली दोन वर्ष लॉकडाउनमुळे ही प्रकिया पार पडू शकली नव्हती. 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत ही समितीने पाहणी केल्यानंतर आता अधिकृत घोषणा झाली. आता हा दर्जा मिळाल्याने विद्यापीठातील संशोधन प्रकल्प, विविध प्रकारचे अनुदानाचे प्रकल्प यासोबतच विद्यापीठात इतर विद्यापीठांच्या करारावर सोबतच शैक्षणिक देवाण-घेवाण असे अनेक मार्ग यापुढे खुले होणार असून हा दर्जा मिळाल्याने मुंबई विद्यापीठ हे पुन्हा एकदा देशातील नामांकित विद्यापीठाच्या श्रेणीत जाऊन बसेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा मिळलेल्या NAAC मानांकनबद्दल मुंबई विद्यापीठाच्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.