नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय राष्ट्रीय क्षमतावर्धक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्या सहयोगाने देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीनदिवसीय राष्ट्रीय क्षमतावर्धक कार्यशाळेचे आयोजन भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्ये करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या पशुवैद्यकीय सल्लागार डॉ. गौरी मल्लापूर, महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांची यावेळी उपस्थिती होती.
या तीन दिवसीय कार्यशाळेदरम्यान देशातील तसेच देशाबाहेरील तज्ञांकडून मार्गदर्शनपर व्याख्याने (ऑनलाईन), प्रत्यक्ष क्षेत्रीय क्रियाकलाप (hands on training) तसेच शिक्षण अधिका-यांमधील परस्परसंवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच अनुभव कथन, कार्यपद्धतींचे मूल्य आणि महत्त्व याबद्दल त्यांना अधिक संवेदनशील होण्यास मदत होईल. तसेच प्राणिसंग्रहालयातील कामकाजात अनुभवात्मक शिक्षण पद्धतींचा समावेश करण्याच्या वाढत्या गरजांसाठी त्यांची क्षमता देखील वाढवेल प्राणिसंग्रहालयात शैक्षणिक कृती आराखडा (मास्टरप्लॅन) विकसित करण्यासाठी अधिक पद्धतशीर दृष्टीकोन, अभ्यागत प्रतिबद्धता वाढवणे आणि समग्र अनुभव नियोजन करणे हेदेखील या कार्यशाळेमधून साध्य करता येणार आहे