मुंबई : महाराष्ट्रात येण्यापूर्वी तामिळ व बंगाली भाषा समृद्ध आहेत हे जाणून होतो. (Aapli Marathi) परंतु राज्यपाल पदाची शपथ घेऊन येथे आल्यावर महाराष्ट्र राज्य हा साहित्याचा सागर असल्याचे दिसून आले. येथील साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य भाषांतरित होऊन इतर राज्यात गेल्यास त्यामुळे अनेक लोकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. उत्तराखंड राज्याच्या साहित्य, संस्कृती, इतिहास व पर्यटनाचे दर्शन घडविणाऱ्या हिंदी मासिक विवेकच्या उत्तराखंड विषयक दिवाळी विशेषांकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
‘उत्तराखंड देवभूमि से विकासभूमि’ विशेषांक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, उद्योजक पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ, हिंदी विवेकचे व्यवस्थापकीय संचालक अमोल पेडणेकर, कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर तसेच मूळतः उत्तराखंड राज्यातील व आता महाराष्ट्र निवासी असलेले गणमान्य लोक उपस्थित होते. आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्राचे लोक सांस्कृतिक दृष्ट्या अभिरुची संपन्न आहेत. राज्यातील वातावरण संगीत, नाट्य, नृत्य व कलेसाठी पोषक आहे. याच करिता विविध राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन स्थिरावतात.

हिंदी प्रदेशातून आलेले लोक इतर भाषा जाणत नाही, परंतु महाराष्ट्रातील लोक आपल्या भाषेशिवाय हिंदी, इंग्रजी तसेच इतरही भाषा जाणतात, (Aapli Marathi) त्यामुळे महाराष्ट्रातील लोक आपल्याकरिता पूजनीय आहेत.उत्तराखंड येथून महाराष्ट्रात आलेले लोक येथील भाषा व संस्कृतीशी समरस झाल्याचे सांगून विविध राज्यांचे विशेषांक प्रकाशित करून हिंदी ‘विवेक’ राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करीत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

उत्तराखंड राज्याने स्थापनेपासून उत्तम प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते उरबा दत्त जोशी, राजेश नेगी, गिरीश शाह, अभिमन्यू कुमार, प्रशांत कारुळकर व पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.