राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून राज्यामध्ये कोरोना नियमांवरील बहुतांश निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये रात्री १० वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, परंतु अजूनही राज्यामधील नाट्यगृहे, सिनेमागृहे व प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या क्षेत्रासोबत संबंधित व्यावसायिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
अभिजीत पानसे यांनी ट्विट करत सरकारवर थेट निशाणा साधला
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून राज्यामधील प्रार्थनास्थळे, सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे, मंदिरे खुली करण्याकरिता भाजप नेते व अध्यात्मिक आघाडी, वारकरी संघटना आग्रही आहेत. तर दुसरीकडे सिनेमागृहे बंद असल्यामुळे कलाकार, तमाशा कलावंत व नाटक क्षेत्रामधील कलाकारांची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आता अभिनेते, सिनेदिग्दर्शक, कलाकार व चित्रपट क्षेत्रासोबत संबंधित इतर मंडळीसुद्धा रोष व्यक्त करत आहेत. काही दिवसांआधी अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवरून राज्य सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिजीत पानसे यांनी ट्विटद्वारे सरकारवर थेट निशाणा साधला आहे. “सरकारने नाट्य कलावंत तसेच बॅकस्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेमध्ये सामील करून खड्डे बुजवण्याची कामे द्यावीत, कारण नाट्यगृहामध्ये जर कोरोना आहे तर रस्त्यावर नाही, असा टोला पानसे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष देणार का, असाही प्रश्न आहे.
कोरोना हा केवळ नाटकाच्या थिएटर्समध्येच असतो का?
राज्यामधील हॉटेल्स मालकांचे, रेस्टॉरंट मालकांचे, जिम मालकांचे, मॉल्स मालकांचे हार्दिक अभिनंदन. मोगॅम्बो खूश हुवा म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह आणि सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा टप्पा लवकरात लवकरच येईल, अशीच आशा बाळगूयात. आता काळजी घ्यायला हवी. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक मंत्री व महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार, अशी पोस्ट फेसबुकवरून शेअर करत प्रशांत दामलेंनी सरकारला उपरोधिक टोला लगावला होता. अभिनेता उमेश कामतने सुद्धा ‘फक्त नाटकाच्या थिएटर्समध्ये कोरोना आहे का?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. “आजूबाजूला पाहिले तर सर्व गोष्टी सुरू झालेल्या दिसत आहेत. मग केवळ नाटक सृष्टी का थांबली आहे. कोरोना हा केवळ नाटकाच्या थिएटर्समध्येच असतो का?”, असे तो म्हणाला होता.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.