वर्धा : हिंगणघाट जळीतकांडात आरोपी विकेश नगराळे याच्यावर न्यायालयाने बुधवारी खुनाचा गुन्हा सिद्ध केल्यानंतर आज न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली आहे. न्यायलायत विकेश नगराळेविरोधात ७२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर समाजमन संतप्त होऊन रस्त्यावर आले होते. मोर्चे, आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला होता. हिंगणघाट जळीतकांडाचा बुधवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने विकेश नगराळेला दोषी ठरवत गुरुवारी शिक्षा जाहीर होणार असल्याचे म्हटलं. खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याच्या दिवशीच शिक्षा सुनावली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे. त्यामुळे आज आरोपी विकेश नगराळेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने आरोपी विक्की नगराळेला शिक्षा सुनावल्यानंतर पिडीतेला न्याय मिळाल्याचे भावना व्यक्त होत आहे. तसंच, आज पीडितेचा स्मृतीदिन असल्याने आजच्याच दिवशी आरोपीला शिक्षा ठोठावल्यामुळं पिडीतेच्या आई- वडिलांना भावना अनावर झाल्या होत्या.
काय आहे घटना?
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी पीडितेचा नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार, १० फेब्रुवारीला मृत्यू झाला. हिंगणघाटच्या वर्दळीच्या चौकातच घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घटनेचे राज्यात विविध ठिकाणी पडसाद उमटले.