पुणे : पदाधिकाऱ्यांना मी कोणताही कानमंत्र देणार नाही, कारण शिवसेनेचे जे असते ते अगदी खुलं असते असे वक्तव्य
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
कोरोनाच्या काळात स्वतःला झोकून देत जनतेची मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानायला मी पुण्यात आलो असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांच्या नव्या संकल्पना, काही सूचना ऐकण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचे नियम पाळताना मोठ्या बैठका घेणं आधी अशक्य होतं. आत्ता कुठं रुग्णसंख्या घटत होती, अशातच पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी सर्वांना काळजी घेण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
महापालिका निवडणुकांच्या बाबतीत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, की कोरोनाचा काळ पाहूनच ते ठरवले जाईल. पण निवडणुका लवकर लागतील असे सर्वांना वाटत आहे. त्याअनुषंगाने सर्वांनी एकत्रीत येऊन निवडणूक लढवावी अशीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. नाताळ आणि नवीनवर्ष हा एक आठवडा प्रत्येकाच्या घरात आनंदाचे क्षण आणतो. पण हे साजरं करताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. लसीकरण करून घ्या, सर्वांनी मास्क वापरायला हवं, ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात युवासेनेचा मेळावा पार पडत आहे. मात्र, या कार्यक्रमात राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमावलीला तिलांजली घालण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. नव्या नियमावलीनुसार राजकीय कार्यक्रमात शंभर जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, युवासेनेच्या या मेळाव्यात शंभरहून अधिकांची उपस्थिती लावली होती. अनेकजण विनामस्क होते. स्वतः आदित्य ठाकरे जिथं आसनस्थ होते, तिथल्या दोन्ही बाजूच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, पण सभागृहात बहुतांश ठिकाणी ही काळजी घेतल्याचं निदर्शनास आले नाही.