नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानासमोर बुलडाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच पकडले. मात्र, विषाचे काही अंश त्याच्या पोटात गेल्यामुळे त्याला तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. विजय पवार (वय ५०) असे या व्यक्तीचे नाव असून ते बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे रहिवासी आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गावरील मेहकर ते लोणार दरम्यानच्या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विजय पवार यांनी तक्रारी करून यापूर्वी उपोषण केले होते. गणपती विसर्जनानंतर या रस्त्याचे काम करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्याने त्यांच्या उपोषणाची सांगता झाली होती.
मात्र, त्या कामाला सुरुवात न झाल्याने विजय पवार यांनी ‘ ३० सप्टेंबर पर्यंत संबंधित विभागाने या कामाला सुरवात न केल्यास उपविभागीय कार्यालय मेहकर ,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यालय मेहकर, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाना, आ. आकाश फुंडकर खामगांव, किंवा नितिन गडकरी यांचे नागपुरातील निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा ईशारा दिला होता’.
परिणामी गडकरी यांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांचा मोठा ताफा हॉटेल रॅडिसनच्या बाजूला असलेल्या गडकरी यांच्या निवासस्थानासमोर नेमण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास विजय पवार अचानक ईमारतीसमोर धावत आले आणि त्यांनी घोषणाबाजी करीत एक बाटली तोंडाला लावली. त्यात काळा निळसर द्रव पदार्थ होता.
पवार यांची घोषणाबाजी ऐकून प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या द्वितीय निरीक्षक विद्या जाधव आपल्या सहकाऱ्यांसह पवार यांच्याकडे धावल्या आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेतली. दरम्यान, त्या बाटलीतील काही द्रवपदार्थ तोंडात गेल्याने पवार यांची प्रकृती बिघडत असल्याचे ध्यानात आल्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने आपल्या वाहनातून मेडिकलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर मेडिकलच्या वार्ड क्रमांक ३६ मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मेडिकलच्या सूत्रांनी सांगितले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.