पुणे : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली होती. त्याला आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. एकमेकांची उणीधुणी काढत बसण्यापेक्षा राणे यांनी केद्रांतून निधी आणावा आम्ही राज्यातून देतो, असे म्हणत पवार यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असता पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारने कोकणाला काय दिले, असा प्रश्न केला होता. याबाबात पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले की, “निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते वादळ यावेळी राज्य सरकारने मदत केली. तसेच, रेडी ते रावस हा रस्ता, १९० कोटींचा बंधारा मंजूर केला.
शिवाय येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयाचे उद्घाटन ही करणार आहोत. कोकणासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे. ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा राणे केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी केंद्रातून निधी आणावा आम्ही राज्यातून निधी देतो, असे म्हणत पवार यांनी राणेंना टोला लगावला आहे.