मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होती. ही जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली, अशी कौतुकाची पावती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिवेशनावर पूर्ण लक्ष आणि नियंत्रण होते. अधिवेशनकाळात विधानसभेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिसत होती. त्यांनी टोले घेत, टोले देत ही जबाबदारी निभावली. अजित पवार यांनी दोन लगावले, चार घेतले, पण एकूणच अधिवेशन व्यवस्थित पार पडले, असे संजय राऊत यांनी म्हटले.
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले. त्यांना सध्या काही निर्बंध आणि पथ्यं पाळावी लागत आहेत. मात्र, हे निर्बंध लवकरच दूर होतील आणि मुख्यमंत्री पुन्हा कामाला लागतील, असे संजय राऊत यांनी म्हटले. आतादेखील ते काम करतच आहेत. कोरोनाच्या काळातही मुख्यमंत्र्यांनी घरी बसून संपूर्ण परिस्थिती हाताळली होती. तेव्हा मंत्रीही मंत्रालयात जात नव्हते, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.