मुंबई : ANM (ऑक्सीलारी नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि GNM (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा CET (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर,वैद्यकीय शिक्षणसहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
ANM आणि GNM अभ्यासक्रमांसाठी CET च्या गुणांवर आधारीत करण्यात येत होत्या
श्री. देशमुख म्हणाले की, यापूर्वी ANM आणि GNM च्या प्रवेशप्रक्रिया या CET च्या गुणांवर आधारीत करण्यात येत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारीत असेल.कोविड सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळत आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, आज किती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हे सुध्दा स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच परिचारिका सुध्दा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्याने किती रुग्णांमागे परिचारिका असाव्यात याचा अभ्यास मंडळाने करणे गरजेचे आहे. इतर राज्यात नेमकी याबाबत काय परिस्थिती आहे याबाबतचा अभ्यास करुन याबाबतचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही श्री.देशमुख यांनी यावेळी केल्या. श्री. देशमुख म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की या क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागत असते. कोविडनंतर आपल्या सर्वांना वैद्यकीय क्षेत्राचे महत्व समजून आले आहे.
शाळांमध्ये सुध्दा परिचारिका असणे आवश्यक
आज शाळांमध्ये सुध्दा परिचारिका असणे आवश्यक आहे. कारखाने, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी सुध्दा तत्काळ उपचारांसाठी परिचारिका असणे आवश्यक आहे.आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीची संधी कशी उपलब्ध होऊ शकेल, कोणता अभ्सासक्रम नव्याने सुरु करण्याची आवश्यकता असल्याने याबाबतचा अभ्यास करुन अभ्यासक्रमांचे नियेाजन करावे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.