स्रोत: रत्नागिरी खबरदार
बिलोली : देशभरात अनेक ठिकाणी पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्यात राष्ट्रवादी देखील मागे नाही. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी लक्ष्मीपूजनाचा आधार घेत मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी एक जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला.

मतदानासाठी पैसा कोणाचाही घ्या, मात्र मतदान महाविकास आघाडीला करा. पंढरपूरमध्ये मतदारराजाकडून जी चूक घडली, माझी इथल्या मतदारांना विनंती आहे की, ही चूक घडू देऊ नका. तुमचे मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक-एक कार्यालय ३० हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपाचा पैसा घ्यायचा पण महाविकास आघाडीला मतदान करायचे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.