बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांना भारतात वास्तव्यास ठेवून त्यांना पारपत्र काढून देणाऱ्या टोळीला शनिवारी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. अटकेत असलेल्या चार आरोपींकडून पोलिसांनी बनावट कागदपत्रे, बांगलादेशी सिमकार्ड, डेबिट कार्ड व बारा पारपत्रे जप्त केली आहेत. पारपत्रांच्या आधारे ही टोळी बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायाकरिता परदेशामध्ये पाठवीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बांगलादेशी नागरिकांना भारतात घेऊन येत
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने कळवा भागात सापळा रचून फारूक याला ताब्यामध्ये घेतले. पोलिसांना त्याच्याकडे काही बनावट कागदपत्रे व पारपत्रे आढळून आली. त्याची चौकशी केली असता त्याने सुरत येथील राहणाऱ्या तीन जणांच्या मदतीने काही बांगलादेशी नागरिकांना भारतात घेऊन येत. तसेच त्यांना वास्तव्य करण्याकरिता बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे समोर आले आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतामध्ये वास्तव्यास
गुजरात पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी सुरत येथील राहणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन अटक केली असून, त्यांची कसून चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान बांगलादेशी महिलांना ही टोळी पारपत्र काढून देत असल्याची माहिती समोर आली. ही टोळी बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतामध्ये वास्तव्यास ठेवत असे. त्यानंतर याच कागदपत्रांच्या आधारे त्यांचे बँक खाते तयार केले जात असे, काही वर्ष हे नागरिक आयकर भरतात. पारपत्राकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना पारपत्र मिळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पारपत्राच्या आधारे बांगलादेशी महिला परदेशामध्ये वेश्या व्यवसाय करण्यास जात असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.
Copyrights – Maay marathi