मुंबई : चांदिवाल आयोगानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. मंगळवारच्या सुनावणीत सचिन वाझेची उलटतपासणी होणार होती. ज्यासाठी अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांनाही जेल प्रशासनानं आयोगापुढे हजर केलं. मात्र वाझेची उलटतपासणी घेण्यासाठी अनिल देशमुखांचे वकीलच गैरहजर राहिल्यानं आयोगाचं मंगळवारचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे आयोगाचा वेळ खर्ची पडल्याबद्दल अनिल देशमुखांना 50 हजारांचा दंड आकारण्यात आला. देशमुखांना ही मदत मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
अनिल देशमुखांना चांदिवाल आयोगानं दंड आकारण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही त्यांच्या वकिलांनी आयोगाकडे वेळ मागितल्यानं देशमुखांना 15 हजारांचा दंड लावण्यात आला होता.
गेल्या सुनावणीत झालेल्या उलटतपासणीत ‘बार मालकांकडून पैसे गोळा करायला अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं का?” यावर “मला काही आठवत नाही” या सचिन वाझेच्या उत्तरानं सर्वजण बुचकुळ्यात पडले होते. कारण सचिन वाझे यांच्या या उत्तरानं हे खरंच अनिल देशमुख यांनी बार मालकांकडनं पैसे गोळा करायला सांगितले होतं का?, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. तसेच अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव कुंदन शिंदे यांनी आपल्याला कधी पैशांची ॲाफर केली होती का? पैसे मागितले होते का? बार ओनर्स कडून पैसे गोळा करायला सांगितले होते का? या प्रश्नांवर सचिन वाझे यांना, “मला आठवत नाही” असंच उत्तर दिलं आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वकीलांनी, ‘कुंदन शिंदे यांनी तुम्हाला काहीच दिले नाही म्हणुन आठवत नाही का?’ या प्रश्नावर सचिन वाझेनं “हो” असं उत्तर दिल्यानं हा गुंता आणखीन वाढलाय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राद्वारे केलेल्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांची हे आयोग समांतर चौकशी करत आहे. के. यु. चांदिवाल या हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी सुरू आहे. या आयोगाच्या सुनावणीकरता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं न्यायालयीन कोठडीत पाठवलेल्या अनिल देशमुख आणि एनआयए कोर्टानं अँटालिया स्फोट तसेच मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन वाझेला नियमितपणे हजर केलं जात.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.