मुंबई : दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं होतं. त्यावरही सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट परब यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. राज्यात लॉकडाऊन असताना परब यांनी स्वत:चं रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेसच्या एमएसईबीचं कनेक्शन घेतलं. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांनीही त्यांच्या पत्नीच्या नावे 19 बेनामी बंगले बांधले आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी, असं सांगतानाच तुमच्या काय मी उद्धव ठाकरेंच्या धमक्यांनाही घाबरत नाही. परब यांना आज ना उद्या कोर्टात जावंच लागमार आहे. परब हे जेलमधूनच कोर्टात जाऊ शकतात. सर्वांना कायदा समान आहे, असं ते म्हणाले.
मला आणि माझ्या मुलालाही धमक्या मिळत आहेत. पण आम्ही या धमक्यांना घाबरत नाही. अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचा घोटाळा बाहेर काढणारच. आम्ही थांबणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे स्टंटबाज आहेत. ते लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमलेले मंत्री, पोलीस आयुक्त फरार झाले आहेत. हे सरकार सामान्य जनतेचं नव्हे तर घोटाळेबाजांचं नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.