ठाणे : पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पूर्वार्धात कोरोना बाधित रुग्णांना बेड मिळणे दुरापास्त झालेल्या ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोव्हिड रुग्णालयात सध्या शुकशुकाट पसरला आहे. सध्या या सेंटरमध्ये फक्त 40 रुग्ण उपचार घेत आहेत.
सध्या उपचार घेत असलेल्या ४०पैकी १६ जण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. पैकी सहा व्हेंटीलेटरवर असून अवघे दोघेजण ऑक्सिजनवर आहेत. उपचार घेणारे इतर 22 जणही ठणठणीत असून लवकरच त्यांना घरी सोडले जाणार आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांप्रमाणे ग्लोबल सेंटर बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
मार्च 2020 च्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यात कोरोनाचा शिरकाव झाला. महामारीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील 27 हून अधिक खासगी रुग्णांना कोव्हिडची मान्यता दिली. काही आठवड्यातच या खासगी रुग्णालयांबाहेर हाऊसफूलचे बोर्ड लागण्यास सुरुवात झाली. खाटा मिळत नव्हत्या तर दुसरीकडे खासगी रुग्णालयात बिलांच्या नावाने प्रचंड लूट सुरू झाली. त्यामुळे मुंबई पाठोपाठ ठाणे महापालिकेने बाळकूम येथे ग्लोबल कोव्हिड सेंटर उभारले होते. सुमारे 1 हजार 50 बेडची व्यवस्था असलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये आतापर्यंत लाखो रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले आहेत. यादरम्यान हे रुग्णालय अनेकवेळ वादाच्या भोवऱ्यातही सापडले. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्लोबलमध्ये खाटांचा काळाबाजार झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. लाख रुपयात येथे बेडचा सौदा झाला होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता एकेकाळी खच्चून भरलेले ग्लोबल रुग्णालयही ओस पडले आहे.
या रुग्णालयातील एक हजारहून अधिक खाटा रिकाम्या आहेत. सध्या या रुग्णालयात 40 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये 16 जण आयसीयूमध्ये आहेत. अतिजोखमीचे सहा रुग्ण असून त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आला आहे. तर ऑक्सिजनवर अवघे दोन रुग्ण आहेत. सामान्य वॉर्डात 22 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे ऐन कोरोना काळात दिवसरात्र सेवा देणाऱ्या आरोग्य यंत्रणेवरचा ताण हलका झाला आहे. दरम्यान कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पालिकेने ग्लोबल व्यतिरिक्त इतर पाच रुग्णालये बंद केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोव्हिड सेंटर बंद होती. तर रुग्णसंख्या वाढल्यानंतर पार्किंग प्लाझा येथे नव्याने कोव्हिड सेंटर उभारण्यात आले. आता येथेही अवघे २२ रुग्ण उपचार घेत आहेत. संशयित रुग्णांसाठी उभारण्यात आलेला विलगिकरण कक्षही ओस पडला आहे. सुमारे 895 खाटांची व्यवस्था असलेल्या या कोव्हिड केअर सेंटरमध्ये सध्या येथे शून्य रुग्ण असल्याने त्याला टाळे ठोकण्यात आले आहे. ठाणे पालिका क्षेत्रातील एकंदरीत रुग्णालयांचा आढावा घेतल्यानंतर एकूण 3 टक्केच खाटा भरल्याचे समोर आले आहे.
शहरामध्ये पालिकेच्या ग्लोबल, पार्किंग प्लाझासह खासगी रुग्णालयांमध्ये एकूण चार हजार 166 खाटांची व्यवस्था आहे. सर्व रुग्णालयांमध्ये मिळून 152 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये 142 रुग्ण जोखमीचे आहेत. आयसीयूचे 919 खाटा, व्हेंटीलेटरच्या 387 तर ऑक्सिजनच्या तब्बल दोन हजार 723 खाटा रिकाम्या आहेत. दुसरी लाट ओसरली असल्याने ग्लोबलमधील खाटा जवळपास 99 टक्के रिकाम्या झाल्या आहेत.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.