मुंबई : आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. माफी मागा म्हणत हक्कभंग आणण्याचा इशारा देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिला. यावर दोन वेळा सभागृह स्थगित झाल्यानंतर अखेर भास्कर जाधवांनी माफी मागितली आणि विषयावर पडदा पडला.
वीजेसंदर्भातील एका प्रश्नावर बोलताना मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं की, 100 युनिट माफ करणार याकडे मी तुम्हांला घेऊन जाईल. मी उर्जा मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर माझं व्हिजन सांगितलं होतं. मात्र कोविडची परिस्थिती आली. कंपनी चालवताना वीज बील भरले पाहिजे. सुट दिली पाहिजे असं म्हणत असतील तर देशाच्या पंतप्रधान यांनी म्हटलं होतं की 15 लाख रुपये रुपये खात्यावर देणार म्हटलं होतं. त्यांनी दिलं का? असं राऊत म्हणाले.
यावरुन फडणवीस कमालीचे आक्रमक झाले. पंतप्रधान यांनी असं वाक्य कुठ म्हटलं आहे हे दाखवा नाही तर माफी मागावी, असं ते म्हणाले. या सभागृहाच्या बाहेरील व्यक्ती संदर्भात असं बोलता येणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे किवा शब्द मागे घेतला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. यावर नितीन राऊत म्हणाले की, पंतप्रधान यांनी पहिल्या निवडणुकीत काळा पैसा परत आणला जाईल आणि त्यातून 15 लाख रुपये दिले जातील असं म्हटलं होतं. हे खोटं असेल तर सिद्ध करून दाखवा, असं राऊत म्हणाले.
यावर आमदार भास्कर जाधव यांनी काहीतरी नक्कल केली. यानंतर विरोधक जास्तच आक्रमक झाले. फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव यांना निलंबित करा. पंतप्रधानांचं अंगविक्षेप करत जाधव यांनी सभागृहात जे वर्तन केलंय ते चुकीचं आहे. ते पंतप्रधान यांची नक्कल करत आहेत. या ठिकाणी अशा प्रकारची नक्कल करणं योग्य आहे का? असं फडणवीस म्हणाले.
यावर भास्कर जाधव म्हणाले की, मी ते पंतप्रधान असल्याच्या आधी बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही. मी माझे शब्द मागे घेतो आणि अंगविक्षेप मागे घेतो. यावर फडणवीस म्हणाले की, अंगविक्षेप मागे घेता येतो का? हे आम्ही सहन नाही करणार. माफी मागीतली पाहिजे. पंतप्रधान यांचा असा अवमान होणार असेल तर हक्कभंग आणला जाईल, त्यांनी माफी मागावी असं ते म्हणाले. त्यांनी अंगविक्षेप केल्याचं मान्य केलं आहे त्यांनी माफी मागितली पाहीजे, असं फडणवीस म्हणाले. यावर मी माफी मागू शकत नाही, मी शब्द मागे घेतले आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित केलं.
फडणवीस म्हणाले की, मी शरद पवार यांच्या संदर्भात ‘सामना’त आलेल वाचत होतो तर मला थांबवण्यात आलं होतं. मात्र आता वारंवार तेच शब्द वापरले जात आहेत. शेवटी विरोधक जास्त आक्रमक झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी मी कोणताही असंविधानिक शब्द वापरला नाही. तरीही सभागृहाच्या काही भावना दुखावल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो, असं जाधव म्हणाले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.