◼️ संभाजी ब्रिगेडचे भारतीय जनता पार्टीसोबत युतीचे संकेत
मुंबई : राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर शिवसेना-भाजपा वेगळे झाले आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मोठी सत्तापालट झाल्याचं दिसून आलं. सत्तेसाठी शिवसेनेने आपली हिंदुत्ववादी भूमिका मवाळ करत किमान समान कार्यक्रम आखला आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यातील या राजकीय घडामोडीनंतर आता आगामी काळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात मराठा समाजाची सर्वात मोठी संघटना असलेली मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला भाजपा हादेखील एक युतीचा पर्याय असू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी लेख लिहून ही भूमिका मांडली. त्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आगामी काळात भाजपासोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून येते.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकात केलेल्या पुढील राजकीय स्थितीचा उहापोह केला आहे. त्यात संभाजी ब्रिगेडला आगामी काळात भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपाच्या आमदार होत्या. परंतु तेव्हाही खेडेकर यांनी सातत्याने भाजपा आणि RSS च्या विचारसरणीवर टीका करत होते. खेडेकर आणि भाजपा विरोध यांचे अनेक किस्से आहेत.
राजकारणात शिवसेना-काँग्रेस हे कट्टर विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊ शकतात मग इतरांना का येऊ नये? काँग्रेस-राष्ट्रवादी जर संभाजी ब्रिगेडला गृहित धरणार असेल आणि केवळ संभाजी ब्रिगेडच्या नावाचा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी वापर करत असेल संभाजी ब्रिगेडला काही राजकीय तडजोडी करून वेगळा पर्याय शोधावा लागेल. किमान समान कार्यक्रमाप्रमाणे भाजपासोबत युती होऊ शकते असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.