स्रोत: रत्नागिरी खबरदार
अहमदनगर : आताच्या घडीला राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सर्व प्रकारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर पंकजा मुंडे यांनी जोरदार टीका केली. आताच्या घडीला राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपांमध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका करत हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली ते माहिती नाही, मात्र राजकारणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे. सत्तेत बसलेले पक्ष आमच्यावर आरोप करत आहेत. या सर्व गोंधळामध्ये राज्याचा विकास मागे पडला असून, नको ते विषय समोर येत आहेत. विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा जर विकासावर भर दिला तर अधिक चांगले होईल, असा खोचक टोला पंकजा मुंडे यांनी लगावला. दरम्यान, राजकारणामध्ये ज्यांनी जे जोडे घातले आहेत, त्यांनी त्याच जोड्याला शोभेल असे वागावे. आम्ही विरोधी पक्षाच्या जोड्यामध्ये आहोत. तर आम्ही विरोधी पक्षासारखे खंबीर वागले पाहिजे. त्याचबरोबर आमची सत्ता होती, तेव्हा आम्ही काय केले आणि काय केले नाही हे ठासून सांगितले पाहिजे. सरकार पडण्याची विरोधकांनी वाट पाहू नये, तर असे कार्य करावे की ज्या कार्याची दखल घेऊन जनता आपोआपच सत्ताधाऱ्यांकडे पाठ फिरवून तुम्हाला निवडून आणेल, असा घरचा आहेर पंकजा मुंडे यांनी भाजपला दिला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.