मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात मुंबई – राजहंस सिंह, नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे, कोल्हापूर – अमल महाडीक, धुळे-नंदुरबार – अमरिष पटेल आणि अकोला-वाशीम – वसंत खंडेलवाल यांच्या नावांचा समावेश आहे. त्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल १४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २३ नोव्हेंबर अशी आहे. यामध्ये मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागांवर या निवडणूक होणार आहेत. मुंबईमधून याआधी दोन उमेदवार निवडून गेले होते. त्यात काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम यांचा समावेश होता. मात्र, आता रामदास कदम यांना संधी न देता त्या जागी सुनील शिंदे यांचे नाव शिवसेनेने जवळपास निश्चित केले आहे. अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेस येथून उमेदवारी देण्याच्या विचारात नाही, असे माहिती आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे विद्यमान मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांची अडचण झाली आहे. दुसरा उमेदवार निवडून आणण्याएवढे संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाही. त्यामुळे दुसरा उमेदवार द्यायचा की नाही या विचारात महाविकास आघाडीचे नेते आहेत. परिणामी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले राजहंस सिंह यांना निवडून येण्याची श्क्यता अधिक आहे. कोल्हापूरमधून काँग्रेसचे उमेदवार राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाने अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अमरीश पटेल पूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र नंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ते पुन्हा निवडून आले. भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्यामुळे ती जागा आता भाजपाकडे जरी असली तरी काँग्रेसने तेथे उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसकडून अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे गिरीश व्यास आधी निवडून आले होते. त्यांच्याऐवजी आता भाजपाने ओबीसी नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने भाजपाचे छोटू भोयर यांना संधी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कारण या मतदारसंघासाठी काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाहीत. अकोला-वाशिममधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया विद्यमान आमदार आहेत. त्यांनाच शिवसेना पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
नेत्यांची पार्श्वभूमी
राजहंस सिंह – राजहंस सिंह हे १९९२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. वर्ष १९९२ ते १९९७ या काळात ते नगरसेवक होते. नंतर २००२ ते २०१२ पर्यंत सलग ते नगरसेवक होते. या कालावधीत २००४ ते २०१२ पर्यंत सलग आठ वर्षे त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पालिकेत कामगिरी बजावली आहे. दरम्यान २००९ मध्ये मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. २००९ ते २०१४ ते विधानसभा सदस्यही होते. २०१७ मध्ये त्यांनी भाजपाध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई भाजपाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
अमल महाडिक – कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघातून भाजपाकडून अमल महाडिक यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध भाजपाचे अमल महाडिक असा सामना रंगणार आहे. २०१४ मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिक विरुद्ध पाटील अशी लढत झाली होती. त्यावेळी महाडिक यांनी पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते.
अमरिश पटेल – पटेल हे मूळचे काँग्रेसचे नेते. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द एक स्वतंत्र राजकारणी म्हणून शिरपूरमध्ये सुरू केली आणि शिरपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, चार वेळा (१९९० ते २००९) शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काँग्रेससाठी काम केले. आतापर्यंत कधीही विधानसभा निवडणूक हरली नाही, असा त्यांचा लौकिक आहे. राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी पद भूषवले. पटेल यांनी शालेय शिक्षण, संस्कृती, क्रीडा कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले होते. युवक कार्य (महाराष्ट्र शासन) २००३-०४ मध्ये तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. २००९ मध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना विधान परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य घोषित करण्यात आले. मागील विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.