कल्याण/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून कल्याणमध्ये शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून भाजपाचे कल्याण शहर कार्यालय फोडत भाजपा कार्यकर्त्याला देखील मारहाण केली आहे.
कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई होळकर चौकात भाजप शहर कार्यालय आहे. राणेंच्या विधानावरून आज राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी भाजप ठिकठिकाणी असलेल्या कार्यलयाला बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. असेअसतानाही कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई होळकर चौकात असलेल्या शहर कार्यालयाची महानगर प्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी आणि शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांडून तोडफोड करण्यात आली. यावेळी काही भाजप कार्यकर्ते शिवसैनीकांना रोखण्याचा प्रयत्न करीत असतानाच दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. मात्र या घटनेमुळे कल्याण शहरात तणावणाचे वातावरण पसरले आहे. आता याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.
कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. तसेच नारायण राणे यांच्या फोटोला मारत आपला निषेध व्यक्त केला. यानंतर तहसीलदार दीपक आकडे यांच्याशी चर्चा करत राणे यांनी मुख्यमंत्री पदाचा अपमान केला असून याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक अरविंद मोरे, नगरसेवक जयवंत भोईर, दिलीप कपोते, युवा सेना अधिकारी अभिषेक मोरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शिवसेना शाखे समोर देखील कल्याणपूर्व शहर सह संपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नारायण राणेंच्या फोटोला चपलांनी मारत राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, नगरसवेक निलेश शिंदे, नगरसेविका राजवंती मढवी आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
This News has been retrieved from RSS feed, We do not claim or own copyrights or Credits.if you Still have problems contact us.