मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना, महाराष्ट्राने करोना पसरवला असे म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. या अपमानाबद्दल मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेसचे आंदोलन असून, काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहेत. मात्र, दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
अतुल लोंढे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना, महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री आणि खासदार बाके वाजवत होते. शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या या अपमानाबद्दल महाराष्ट्राची जनता भाजपला कदापि माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा घोर अपमान केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेची पंतप्रधान मोदींनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप आंदोलन करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पुतळे, फोटो जाळून भाजप त्यांची ‘नथुराम प्रवृत्ती’ दाखवत आहे, असेही लोंढे म्हणाले.
राज्यातील भाजप नेत्यांनी मोदींना महाराष्ट्राच्या अपमानाची जाणीव करून देत माफी मागायला सांगितली असती आणि पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध केला असता तर बरे झाले असते. परंतु भाजपसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मतांसाठी आहेत हेच यातून दिसून येते.
शेतकरी आंदोलनावेळीही शेतकऱ्यांना अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून हिणवले, एक वर्ष त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आणि उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होताच पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्याची माफी मागितली. महाराष्ट्राचा अपमान केला; परंतु सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून माफी मागत नसतील तर महाराष्ट्राची जनता भाजपला आगामी निवडणुकीत त्यांची जागा नक्की दाखवून देईल. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राची माफी मागत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसचे हे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही लोंढे यांनी दिला.