मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर नारायण राणेंना लगेच जामिनही मंजूर झाला होता. आता नारायण राणेंची सुटका झाली असली तरी दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्याचदरम्यान, आता नारायण राणेंच्या अटकेवरून भाजपाने एक गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंवर झालेली अटकेची कारवाई काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का? असा सवाल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांच्या विधानाचा हवाला देत भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, हा देशपातळीवरचा गेम आहे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त नक्की कशाला म्हणताहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का? राज्याच्या पोलीस संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी, अशी मागणीही भातखळकर यांनी यावेळी केली.