मुंबई : “कोविड काळातील कार्याचे घरच्यांनी नव्हे पण न्यूयॉर्कमधून कौतुक झाले. कोणी कौतुक करावे म्हणून काम करीत नाही. पण जरा कुठे खुट्ट झाले की विरोधक पालिकेच्या डोक्यावर खापर फोडण्यास तयार असतात.
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून आता भाजपनं पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप नेते ॲड. आमदार आशिष शेलार यांनी काही प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? ११४ टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुन ही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा?, वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले?, मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले?, परिक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे?, ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?,मुंबईत गेल्या ११ वर्षात ४० हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली?” असे अनेक प्रश्न शेलार यांनी केले आहेत.
“कोस्टलरोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा?, मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले?, मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले?, असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण. प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा समाचारही घेतला आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
कामे न करता बोलणारे देखील अनेक लोक आहेत. तर, काही लोक काम करतात पण बोलतच नाहीत. मग त्याला आपण असे म्हणतो की ‘जंगल मै मोर नाचा किसने देखा’. तर आपण सगळ्यांना दाखवतोय की आम्ही काय करतो आहोत. यामध्ये लपवाछपवीसारखे काहीच नाही. आमचा कारभार उघडा आहे, जे काय आहे ते तुमच्या सेवेसाठी आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापालिका आणि राज्यातील माझ्या सहकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळे आज जागतिक स्तरावर कौतुक होत असल्याचेही ते म्हणाले.