मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर गोवा निवडणुकीसाठीचे प्रभारी असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबईत पक्षाच्यावतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं.
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं.
विजयाने नम्र व्हायचं, विजयाने मेहनत करायची आहे. अभी तो असली लडाई मुंबई में होगी. मुंबईला कोणत्या पक्षापासून वेगळं करायचं नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. आज विजय साजरा करा, उद्यापासून कामाला लागा. आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असून, २०२४मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल,असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.