मुंबई : प्रगतीशिल व त्यासोबत पर्यावरण स्नेही मुंबई महानगर घडवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात असून त्यामध्ये आज स्वाक्षरी करण्यात आलेले तीनही सामंजस्य करार हे महत्त्वाचे आहेत. सन २०२८ पर्यंत मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसेस या विद्युत ऊर्जेवर धावणाऱया अर्थात इलेक्ट्रीक असतील, असे उद्गार राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.
बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत, पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टिने मुंबई वातावरण कृती आराखडा बनविण्याची कार्यवाही वेगाने सुरु आहे. मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये महत्त्वाचे ठरणारे तीन नवीन उपक्रम राज्य पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहेत. वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन आणि ई-बस मिशन असे हे तीन उपक्रम असून या तीनही उपक्रमांच्या सामंजस्य करारांवर दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ महानगरपालिका मुख्यालयात समिती सभागृहात स्वाक्षऱया करण्यात आल्या. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे हे बोलत होते.
मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, उपमहापौर श्री. सुहास वाडकर, स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, विरोधी पक्षनेता श्री रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटनेता श्रीमती राखी जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष श्री. सदानंद परब, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष श्री. स्वप्नील टेंबवलकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्रा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, सहआयुक्त श्री. अजित कुंभार, श्री. रमेश पवार, श्री. चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त श्री. रमाकांत बिरादार, श्री. सुनील गोडसे आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष श्री. दत्ता पोंगडे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा श्रीमती राजराजेश्वरी रेडकर, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुजाता सानप तसेच सी ४० सिटीजच्या जागतिक नेतृत्व प्रमुख श्रीमती जेन लुमुम्बा, वुमन फॉर क्लायमेटच्या प्रतिनिधी श्रीमती मार्था स्टेन्सल, डब्ल्यूआरआय इंडियाचे श्री. पवन मुलूकुटिया व इतर मान्यवरांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी संबोधित करताना श्री. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणाचे भान राखून त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी याआधीच निरनिराळ्या उपायांची अंमलबजावणी केली आहे. कचऱयाचे ओला-सुका वर्गीकरण, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नागरी वनीकरणाचा भाग म्हणून गत दीड वर्षभरात लावलेली सुमारे अडीच लाख झाडे असे उपक्रम त्यात समाविष्ट आहेत. त्यापुढे जाऊन आता पर्जन्य जल संवर्धन करण्यासाठी गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये परिसर व शक्य तिथे शोष खड्डे करुन त्यात पाणी मुरवले पाहिजे. वाहतूक बेटं, उड्डाण पुलांखालील जागा, मैदानांभोवती कुंपण स्वरुपात याप्रमाणे झाडांची लागवड केली पाहिजे. वातावरण बदल तीव्र होत असून त्याचा सामना सर्वच देशांना करावा लागतो आहे. अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून शाश्वत विकासासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी केले. वातावरण बदल सक्षमतेसाठी चळवळ उभी करताना त्यात महिलांचे नेतृत्व उभे करण्यासाठी देखील आपण आज करार केला, ही समाधानाची बाब आहे, असे ते म्हणाले.
मुंबईतील बेस्ट उपक्रमामध्ये यापुढे दाखल होणारी प्रत्येक बस ही इलेक्ट्रीक असेल. सन २०२८ पर्यंत संपूर्ण बेस्ट बस ताफा हा इलेक्ट्रीक असेल, असा मानस व्यक्त करुन बेस्टच्या डबल डेकर बसेस या इलेक्ट्रीक किंवा हायड्रोजन फ्युएल सेल यापैकी जास्त सक्षम असेल, त्या ऊर्जेआधारे धावताना दिसतील, असेही श्री. ठाकरे यांनी नमूद केले.
मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या पर्यावरण संरक्षणासाठी उत्कृष्ट कामगिरी होत आहे. आजच्या सामंजस्य करारांमुळे सार्वजनिक व खासगी क्षेत्राला एकत्र आणण्याचे काम झाले आहे. पर्यावरण खात्याला लोकाभिमुख चेहरा देण्याची मोलाची कामगिरी श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून झाली आहे. पर्यावरण रक्षणामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी केलेला करार हा महिला नेतृत्वाला अधिक वाव देणारा ठरेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. मुंबईसह महाराष्ट्र प्रदूषणविरहीत झाले तर त्यातून देशाला उत्कृष्ट प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी मनोगतात नमूद केले की, खासगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकीत संस्थांसमवेत सामंजस्य करार केल्याने, जगभरात जे सर्वोत्कृष्ट कार्य अशा संस्थांद्वारे होते, ते तंत्रज्ञान, अनुभव महानगरपालिका प्रशासनाला मिळू शकणार आहे. शासनाने सन २०२५ पर्यंत १५ टक्के सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याहीपुढे जाऊन महानगरपालिकेने सन २०२३ पर्यंत ५० टक्के सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वातावरण बदल व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा जनतेचा प्रत्यक्ष प्रेरक सहभाग वाढविण्यासाठी मोलाचा आहे, असे आयुक्तांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन योग्य दिशेने पुढे जात असल्याचा आत्मविश्वासही श्री. चहल यांनी व्यक्त केला.
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्रा म्हणाले की, राज्य शासनाने अलीकडे जाहीर केलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाला अनुसरुन बेस्ट उपक्रमाची वाटचाल सुरु आहे. बेस्टचा ताफ्यामध्ये यापुढे इलेक्ट्रीक वाहनेच समाविष्ट केले जातील. महानगरामध्ये इलेक्ट्रीक वाहने विद्युत भारित (चार्ज) करण्यासाठी सुमारे ५५ ठिकाणे निवडली आहेत. तेथे खासगी-सार्वजनिक भागीदारीतून येत्या ३ ते ४ महिन्यात चार्जिंग स्टेशन उभे राहतील. यामुळे सर्वसामान्य जनतेलाही वाहने चार्ज करण्याची सुविधा मिळेल. जनतेला शाश्वत, किफायतशीर, उत्कृष्ट आणि सर्व परिसरांना जोडणारी अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा बेस्टच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी आमूलाग्र बदल होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
आज झालेल्या करारांची संक्षिप्त माहितीः
वुमन फॉर क्लायमेट या उपक्रमातून मुंबई महानगरात पर्यावरण संरक्षण व संवर्धन उपक्रमांमध्ये पुढाकार घेण्यासाठी, निरनिराळे उपाय सुचवून त्यांची प्रत्यक्ष व्यापक अंमलबजावणी होण्यासाठी महिलांचे नेतृत्व विकसित करण्यात येणार आहे.
सिटीज् फॉर फॉरेस्टस् या वनसंरक्षण, वन जीर्णोद्धार, वन व्यवस्थापनाशी निगडित करारावर जगभरातील ५७ शहरांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी स्वाक्षरी केली आहे. त्यात मुंबईचाही समावेश आहे. या उपक्रमाला मुंबईमध्ये चालना देण्याच्या दृष्टिने तसेच त्यामध्ये जनतेचा सहभाग निर्माण करण्यासाठी रेडिओ मिर्ची एंटरटेनमेंट नेटवर्कद्वारे जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन हा करार आहे.
ई-बस मिशन हा करार ट्रान्सफॉर्मेटिव्ह अरबन मोबिलिटी इनिशिएटिव्ह (टूमी) अंतर्गत, मुंबई महानगरात धावणाऱया बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमाच्या विद्युत बसेस उपक्रमामध्ये दर्जोन्नती करण्यासाठीचा करार आहे. यामध्ये बेस्ट प्रशासनाला वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) इंडिया हे तांत्रिक सहाय्य करणार आहेत. बेस्ट उपक्रमामध्ये विद्युत उर्जा आधारित बसेसची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. बेस्ट बसेस विद्युतभारित (चार्जिंग) करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीचे नियोजन, कामगिरीचे मूल्यमापन आणि नागरी धोरण यांची आखणी व इतर विषयांमध्ये बेस्ट प्रशासनाला तांत्रिक सहाय्य पुरवण्यासाठी डब्ल्यूआरआय या आंतरराष्ट्रीय संस्थेचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातून बेस्ट उपक्रमाला पारंपरिक बसेसमधून विद्युत आधारित बसेसमध्ये परावर्तित होण्यासाठी सुलभ, सहज तांत्रिक मार्गदर्शन तर मिळेलच, सोबत किमान पाच लहान शहरांना देखील भविष्यात विद्युत ऊर्जा आधारित बसेसचा अवलंब करण्याबाबत प्रोत्साहित करता येईल. इलेक्ट्रीक बसेस कोणत्या मार्गांवर, किती संख्येने, कोणत्या वेळेत बसेस धावल्या पाहिजेत, विद्युत उर्जेवर धावणाऱया बसेसचा सुयोग्य आणि परिपूर्ण उपयोग कसा करता येईल, अधिकाधिक प्रवाशांपर्यंत ही सेवा कशी नेता येईल अशा सर्वांगीण पैलुंचा यामध्ये विचार केला जाणार आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.