
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे यशस्वी प्रयत्न
नवी दिल्ली दि.29 जुलै :
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढत्या वायू प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून महापालिकेला 33 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगानुसार मिलियन प्लस सिटी योजनेअंतर्गत येत्या 2 दिवसांत हा निधी पालिकेच्या खात्यात जमा होणार आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला.
केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगानुसार महापालिका क्षेत्रातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी निधी दिला जातो. त्यानुसार केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र अद्याप तो कल्याण-डोंबिवली महापालिकेला मिळाला नव्हता. याबाबत खासदार कपिल पाटील यांनी २९ जून रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविले होते. तसेच संबंधित निधी लवकरात लवकर वर्ग करण्याची विनंतीही केली होती. केंद्रीय राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर कपिल पाटील यांनी हा निधी वेगाने मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानूसार येत्या 2 दिवसांत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या खात्यात हा 33 कोटींचा निधी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
निधीतून होणार ही कामे….
कल्याण-महापालिकेने हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मिलियन प्लस सिटी योजनेतून आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, उद्योगाचे नुतनीकरण, विद्युत किंवा गॅस शवदाहिनी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिग्नल, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, प्रदूषण रोखण्यासाठी हवा शुद्धीकरण युनिट आणि हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्र उभारणे प्रस्तावित आहे.
This News has been retrieved from RSS Feed. If you Own this news please contact us for credits.