मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे,” असं म्हणत शरद पवार यांनी मोदींचं कौतुक केलं.
बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. पवार यांच्या या विधानानंतर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पाटील यांनी भाष्य करण्याइतका मोठा नेता आपण नसल्याचं म्हटलंय. तर, भाजपा-शिवसेना एकत्र येणार का या प्रश्नावर स्पष्टचं उत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटीलयांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी-पवार भेट, शिवसेना, परीक्षा घोटाळे यांसह अनेक भाष्य केलं. दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.
”गेल्या 26 महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा जो इतिहास आहे, अडकविण्याचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निधी द्यायचा नाही, त्यांच्या आमदारांना द्यायचा हा जो इतिहास आहे. तसेच, महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा जो इतिहास आहे, तो पाहता. यांच्यासोबत जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी इच्छा नाही, अर्थात केंद्रीय नेतृत्त्व ते ठरवेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.