मुंबई : भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. रश्मी ठाकरे यांच्यावर ट्विट करणाऱ्या जितेन गजारिया यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करुन पोलीस योग्य ती कारवाई करतील. मात्र, यानिमित्ताने मी भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, ज्यामधून कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काही करु नये. चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांसाठी एकप्रकारची समज मानली जात आहे.
नेमका वाद काय?
जितेन गजारिया हे भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी आहेत. त्यांनी रश्मी ठाकरे यांच्याविषयी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’, असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
गजारियांच्या वकिलांची शिवसेनेला वॉर्निंग
बीकेसी कार्यालयात सायबर पोलीस सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी सायबर सेलच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर जितेन गजारिय यांच्या वकिलांनी त्यांच्या ट्विटचे पूर्णपणे समर्थन केले. तसेच शिवसेना सत्तेचा गैरवापर करुन पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार आज आहे, उद्या नसेल. उद्या आमचं सरकार आलं तर कायद्याच्या चौकटीत राहून कशी कारवाई करायची, हे आम्हालाही माहिती असल्याचा इशारा गजारिया यांच्या वकिलांनी शिवसेनेला दिला.