नाशिक : आजच्या स्पर्धेच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेच्या काळात इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्या वतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले असून महाज्योतीच्या माध्यमातून आधुनिक प्रकारचे शिक्षण देण्यासाठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे महाज्योती संस्थेच्यावतीने मोफत टॅब वाटप कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, मागास प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, शिक्षणापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी महाज्योती संस्थेने आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. याकरीता महाज्योती, बार्टी, सारथी,तार्ती अशा संस्थांना समानतेने सहकार्य करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक क्रांतीच्या इतिहासाचा अभ्यास करावा. या थोर पुरुषांच्या विचारांच्या मार्गाने विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केल्यास देशाची देखील नक्कीच प्रगती होईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
महाज्योतीच्या विभागीय कार्यालयासाठी सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासनाने जागा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. जेणेकरून महाज्योतीच्या माध्यमातून गोर गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळेल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या कार्यक्रमात महाज्योतीमार्फत इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 122 विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तनुजा भालेराव, नंदिनी वाकारे, गायत्री पुंड, दानीज शेख, सूरज परदेशी, सूरज परदेशी व रोहिणी मिस्त्री या विद्यार्थ्यांना पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते मोफत टॅबचे वाटप करण्यात आले.
महाज्योती संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत टॅब सोबत दररोज सहा जीबी इंटरनेट डेटाची सुविधा नीट परीक्षा होईपर्यंत साधारण दिड वर्षे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या विविध शैक्षणिक सुविधांची माहिती देखील महाज्योती संस्थेचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी प्रास्ताविकात सांगितली.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.