स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : संपूर्ण राज्यात आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या मोहिमेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असून जास्तीत जास्त महिला नवमतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी समन्वयाने काम करून शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांना केले.
दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यात होणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. श्री.देशपांडे म्हणाले की, जास्तीत जास्त महिलांची मतदार नोंदणी करण्याकरिता त्यांच्यापर्यंत संदेश घेऊन जाणे आवश्यक आहे. नवविवाहितेचे नाव तिच्या सासरकडील मतदार यादीत होण्यासाठी तीच्यापर्यंत जावी, यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात यावा.
मतदार यादीत महिलांना नाव नोंदणी करावयाची आहे, ही माहिती जर एका महिलेपर्यंत गेली तरी ती सर्व कुटुंबापर्यंत जाते. नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. दिनांक 13 व 14 नोव्हेंबर आणि 26 व 27 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत असून दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे.
या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी सांगितले. राज्यातील नवमतदार, तृतीयपंथी तसेच दिव्यांगांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक ती लागणारी सर्व मदत उमेदमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वसेकर यांनी यावेळी दिली.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.