सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांना सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १ हजार ७८ मुलांनी कोवॅक्सीनचा डोस घेतला.
त्यात ८६९ मुले तर २०९ मुलींचा समावेश आहे. १५ जानेवारीपर्यंत ३८ हजार ९७५ मुलांना लस देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी दिली.
जिल्ह्यातल्या तालुकानिहाय आठ ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयात लसीकरण केंद्र ठेवण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी १०० प्रमाणे ८०० डोस उपलब्ध ठेवले होते. मात्र बऱ्याच ठिकाणी मुलांची संख्या वाढल्याने आणि मागणी वाढल्याने जादा डोस देण्यात आले आहेत. सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत लसीकरण पार पडले. जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले असून १५ जानेवारी पर्यंत लसीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.