मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभर एसटी कामगारांचा संप सुरू आहे. महामंडळाचे सरकारी सेवेत विलिनीकरण केल्यावरच संप मागे घेणार असल्याचं कामगारांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे राज्यात प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. तसेच महामंडळाकडून संपकरी कामगारावर निलंबनाची कारवाई देखील होत आहे, या पार्श्वभुमीवर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून विनंती केली आहे.
चित्रा वाघ आपल्या पत्रातून म्हणतात की, आपल्याला माहित आहे की, गेले 5 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत. असं त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, एसटी विलिनीकरणाचा मुद्दा काढला की बॅलन्सशीट पुढे केली जातेय. सुमारे 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. त्यांची मुलं पोरकी झालीत. पत्नी विधवा झाल्या आहेत. ही जीवितहानी कशी भरुन येणार? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय.
दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा.. असं पत्र चित्रा वाघ यांनी अजित पवारांना लिहिलं आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.