गेल्या दीड वर्षापासून राज्यामधील कोरोना संकट परतवून लावण्याकरिता अविरतपणे झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांकरिता सिडकोने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोना योद्ध्यांना नवी मुंबईमध्ये स्वस्तात घरे मिळणार आहेत. कोरोना योद्ध्यांच्या कामगिरीसंदर्भात कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमांमधून त्यांच्याकरिता घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानुसार सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेमध्ये कोरोना योद्ध्यांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत.
या पाच परिसरांमध्येच ही घरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सिडकोमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामधील कोरोनायोद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी नवी मुंबईच्या ५ नोड्समध्ये ४४८८ घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नवी मुंबईमधील तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ परिसरांमध्येच ही घरे असणार आहेत.
एवढ्या लोकांना योजनेचा लाभ मिळणार
कूण ४४८८ घरांपैकी १०८८ घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता, ईडब्लूएस व उर्वरित ३४०० घरे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत, तसेच वैधानिक तरतुदींनुसार काही घरे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत. https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावरून या योजनेसंबंधित सविस्तर माहिती, घरांचा तपशील, विविध प्रवर्गांकरिता राखीव घरे, अनामत रक्कम, योजनेचे वेळापत्रक इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com