
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध खाजगी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. सर्व नागरिकांचे कोविड १९ लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लसीकरणाशिवाय या आजाराचा धोका कमी होणार नाही. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि एच एन रिलायन्स फाऊंडेशनच्या सौजन्याने मुंबईत दीड लाख नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वरळी कोळीवाडा येथे करण्यात आला. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी, रिलायन्स फाऊंडेशनच्या डॉ.तरंग आदी उपस्थित होते. यानंतर या मोहिमेअंतर्गत सायन कोळीवाडा येथील प्रतीक्षानगर शाळा संकुलात आयोजित लसीकरण शिबिरासही ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईची लोकसंख्या विचारात घेता येथे लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेसोबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. या मोहिमेत खाजगी रुग्णालये आणि कंपन्यांच्या सीएसआर निधीचा उपयोग करून लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार रिलायन्स फाऊंडेशन स्वतःहून पुढे आले असून त्यांच्या सौजन्याने ही मोहीम राबविली जात आहे.
महाराष्ट्र हे एक कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे राज्य आहे. तथापि इतरही राज्यांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. तोपर्यंत कुणीही सुरक्षित असणार नाही. मुंबईत ९० लाखांपैकी सुमारे ५५ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांनी दुसरा डोसही वेळेत पूर्ण करावा, तसेच कोविड बाबतच्या नियमांचे आवर्जून पालन करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. कोविड १९ नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक करून ठाकरे यांनी महापालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com