ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. घटना घडली तेव्हा 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर सात जण भाजले गेल्याचं भोसले यांनी सांगितलं आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं यावेळी भोसले यांनी सांगितलं. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी संपर्क साधत तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशामन दलानं युद्धपातळीवर कार्य करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आगीनं होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.