सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या केंद्राच्या तसेच राज्य शासनाच्या आवास योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी काम करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हा ग्रमीण विकास यंत्रणेमार्फत महा आवास अभियान ग्रामीण2 सन 2021-22 अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. आवास योजनेमध्ये ज्यांना लाभ दिला जातो त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अधिकारी, कर्मचारी यांनी विचार करावा असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, गेल्या वर्षी आपला जिल्हा आवास योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. तसाच तो यंदाच्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर असेल यासाठी सर्वांनी काम करावे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व गट विकास अधिकारी यांनी दर 15 दिवसांनी अभियानाचा आढावा घ्यावा. तसेच येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समन्वय राखावा.
वंचित आणि दुर्बल घटकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतलीच पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. काही ठिकाणी आवास योजना या जमिनीच्या प्रश्नामुळे थांबल्या आहेत. त्याठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आवास योजना चांगल्या प्रकारे जिल्ह्यात राबवल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. ज्येष्ठ नागरीक, अपंग, विधवा, दुर्बल, वंचित घटकांना त्रास होणार नाही याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. अशा व्यक्ती भेटीसाठी आल्यास त्यांना ताटकळत न ठेवता त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर त्यांची अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.
ज्येष्ठ नागरिकांशी कशा प्रकारे वागावे याविषयीच्या शासन निर्णयाची सर्वांनी तंतोतंत अंमलबजावणी करावी. आपल्या आई-वडिलांना ज्या प्रमाणे आपण मान देतो त्याच प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना मान दिला गेला पाहिजे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केल्या. या कार्यशाळेनंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी आमदार श्री. नाईक, पोलीस अधिक्षक श्री दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, डॉ. संदेश कांबळे, नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्या उपस्थितीत कोविड 19 आणि ओमायक्रॉन विषाणूबाबत केलेल्या उपाययोजना तसेच जिल्ह्यातील लसीकरण याविषयी आढावा घेतला. जिल्ह्यातील लसींकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देऊन, प्रत्येक नागरिकाचे लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील भात खरेदीविषयीही यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी बैठक घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भातखरेदीच्या नियमांमध्ये काही बदल करणे गरजेचे असल्याचे सांगून लवकरच तसे बदल केले जातील असेही त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त भात खरेदी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.