सुप्रसिद्ध पॉप सिंगर यो यो हनी सिंगविरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसा व इतर हिंसाचाराविरोधामध्ये दिल्लीमधील तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामध्ये त्याच्या पत्नीने दहा कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही केली आहे. या प्रकरणावर आज दिल्लीमधील तीस हजारी कोर्टामध्ये सुनावणी झाली, परंतु या सुनावणीला यो यो हनी सिंग अनुपस्थित राहिला. त्यामुळे न्यायालयाने त्याला चांगलेच फटकारले.
यो यो हनी सिंग कोर्टामध्ये सुनावणीला का अनुपस्थित राहिला
शालिनी तलवारने दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणी काळात हनी सिंगच्या वकिलांनी त्याची प्रकृती व्यवस्थित नसल्याचे कारण देत तो सुनावणीला अनुपस्थित असल्याचे सांगितले. पुढच्या सुनावणीला तो आवर्जुन उपस्थितीत राहील, असे आश्वासन हनी सिंगच्या वकिलांनी दिले आहे. यावरून न्यायालयाने हनी सिंगला चांगलेच फटकारले. यावर न्यायालयाने हनी सिंगचे मेडिकल रिपोर्ट, आयटी रिटर्न सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे आता हनी सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
हनी सिंगचे वकिल न्यायालयाला काय म्हणाले
सुनावणी काळात हनी सिंगच्या वकिलांनी याप्रकरणी उत्तर दाखल करण्याकरिता काही वेळ मागितला आहे. सुनावणीकरिता हनी सिंगच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवर बोलताना ‘कोणीही कायद्यापेक्षा वर नाही’ असेही न्यायालयाने म्हटले. यावर हनी सिंगच्या वकिलांनी न्यायालयाला विश्वास दाखवत हनी सिंग लवकरात लवकर न्यायालयामध्ये वैद्यकीय अहवाल व आयकर विवरणपत्र सादर करेल, असेही म्हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे.
पत्नीच्या मालमत्तेसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ शकत नाही
यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने हनी सिंहच्या विरोधामध्ये केलेल्या तक्रारीवर तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंह यांनी हनी सिंगच्या विरोधात नोटीस लागू केली होती. यामध्ये त्याला २८ ऑगस्टपर्यंत पत्नीने लावलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्यास बजावले होते, परंतु न्यायालयाने हनी सिंगला एक आदेश देत हनी सिंग त्याच्या व त्याच्या पत्नीच्या मालमत्तेसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असेही म्हटले होते.
हनी सिंगवर पत्नीने केले हे आरोप
हनी सिंगची पत्नी शालिनीने त्याच्यावर बरेच आरोप केले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून हनी सिंग शालिनी यांना घरात वाईट पद्धतीने वागणूक देत होता. शालिनीने पती हनी सिंगवर घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ व तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचा आरोप केला. एकदा जेव्हा शालिनीने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, यानंतरही तो प्रचंड रागावला व त्याने शालिनीला खूप मारले असल्याचेही शालिनीने सांगितले.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.