स्रोत: रत्नागिरी खबरदार
अमरावती : अमरावती शहरात शुक्रवारी 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज, शनिवारी शहरात बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी काही अज्ञात लोकांकडून तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलिस आयुक्त कार्यालयाकडून शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. नवारात्र उत्सवादरम्यान बांगलादेशात हिंदुंचे शिरकाण करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधात त्रिपुरा येथे मोर्चा काढण्यात आला. त्रिपुरातील मोर्चावरून सोशल मिडीयावर अफवा आणि बनावटी मॅसेज फिरवण्यात आले. त्यामुळे त्रिपुरातील कथित घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, नाशिक येथील मालेगाव, नांदेड आणि अमरावती शहरांमध्ये शुक्रवारी 12 नोव्हेंबर रोजी रझा अकादमी, सुन्नी जमातुल-उलेमा आदि संघटनांनी बंदची हाक दिली.
त्रिपुरातील कथित घटनेच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देण्यासाठी हे मोर्चे काढण्यात आले होते. परंतु, मोर्चा दरम्यान नांदेड, मालेगाव आणि अमरावती शहरात दंगलखोरांनी दहडफेक आणि हिंसक आंदोलन केले. याचा निषेध म्हणून आज, शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. अमरावती येथे शुक्रवारी घडलेल्या घटनांच्या विरोधात आयोजित मोर्चादरम्यान शनिवारी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या. शहरातील राजकमल चौक, नमुना गल्ली, अंबापेठ या भागात दुकाने व वाहनांची जाळपोळ, तोडफोड झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. राजकमल चौक, नमुना गल्ली, अंबापेठ परिसरातील पाच ते सहा दुकानांचे कुलूप तोडून तोडफोड करण्यात आली. काही पानटपऱ्याही फोडण्यात आल्या.
शिवाय संतप्त जमावाने तोडफोड केल्यानंतर पाच ते सहा दुकानांना आग लावली. या घटनेनंतर प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी आयुक्तालयाच्या हद्दीत संचारबंदीची घोषणा केली. सदर आदेशात नमूद केल्यानुसार, अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे. संचारबंदी कालावधीत कोणताही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही.कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये. या आदेशाचा भंग करणारा कोणताही व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.