पुणे : सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. सर्वात जास्त ओमायक्रॉनबाधितांची नोंदही पुण्यात झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या २० जानेवारीच्या अहवालानुसार, पुणे जिल्ह्यात सध्या ७४ हजार सक्रिय रुग्ण आहेत.
ठाणे जिल्ह्यात ५१ हजार तर मुंबईत २२ हजार सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी २८ टक्के रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोना लाटेतील आत्तापर्यंतची एक दिवसातील सर्वाधिक १४ हजार ४२४ इतकी रुग्णसंख्या २० जानेवारी रोजी नोंदवली गेली. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रूपाने मुंबईतून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या सव्वा लाखापर्यंत पोहोचली होती. त्यानंतर एक आठवड्याने पुण्यातील रुग्णसंख्या वाढू लागली. आणखी आठ-दहा दिवसांनी पुणे जिल्ह्यातील लाट ओसरू लागेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी संसर्ग सौम्य स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे.ओमायक्रॉनबाधितांची संख्याही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. आत्तापर्यंत पुणे शहरात 865, पिंपरी-चिंचवड मध्ये 118 आणि पुणे ग्रामीणमध्ये 56 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 865 इतके ओमायक्रॉनबाधित रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. त्या खालोखाल मुंबईमध्ये 687 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वात कमी रुग्ण रायगड, वर्धा, भंडारा आणि जळगाव येथे असून येथील रुग्णांची संख्या प्रत्येकी एक इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 1039 इतकी झाली आहे.