मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीसंदर्भात विमा कंपन्यासोबत चर्चा करू, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषदेत सदस्य प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याबाबत प्रश्न विचारला होता.या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्यासंदर्भात हवामान धोक्यांमध्ये सुधारणा करुन सुधारित हवामान धोक्यांनुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मंडळस्तरावर बसविण्यात आलेली पर्जन्यमापक यंत्रे गावपातळीवर बसविण्याचा विचार सुरु आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचे दावे नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याबाबत विमा कंपन्यांकडून आढावा घेतला जाईल. सोलापूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये मृग बहार आणि आंबिया बहार हवामान आधारित फळपीक विमा योजनेत 38 हजार 561 अर्ज आले होते. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र विमा कंपन्यांनी नामंजूर केलेल्या अर्जाबाबत आढावा घेतला जाईल असेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले सोलापूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये मृग बहार व आंबिया बहारसाठी शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला. योजनेच्या निकषांनुसार मृग बहार 2020 मध्ये पात्र शेतकऱ्यांना 57 लाख 16 हजार रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाईपोटी अदा करण्यात आली तर आंबिया बहार 2020-21 मध्ये सोलापूर जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना 3 कोटी 29 लाख रुपये इतकी विमा नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी लक्ष घालावे, असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.