पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर केलेल्या निकालावर काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर संबंधित विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत राज्य मंडळाकडे अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य मंडळामार्फत आणि अन्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या २०२१ च्या मुल्यमापनासंदर्भात दाखल याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्ये निकाल दिला आहे. त्यानुसार या परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात आला. परंतु बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य मंडळामार्फत बारावी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप, तक्रारी असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी २५ सप्टेंबरपर्यंत तक्रार अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी यांची नोंद घ्यावी, असे डॉ. भोसले यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.