नागपूर : मुंबई भाजप आमदार आशीष शेलार यांच्यावर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात विनयभंग आणि स्त्री मनास लज्जा होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शंका उपस्थित केली आहे. आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळं भाजपानं आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी शिवसेनेवर टीका करत शंका उपस्थित केली आहे.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ‘भाजपचा कोणताही नेता आणि विशेषतः आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरु शकत नाहीत. महापौरांबद्दल तर अजिबात नाही. काल त्यांची पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट याचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी कदाचित गुन्हा दाखल झाला का हा देखील एक प्रश्न आहे,’ अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे. ‘महापौर किंवा कोणत्याही महिलेबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. त्यामुळं आशिष शेलार किंवा भाजपा कोणीही त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे शब्द वापरु शकत नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.