मुंबई : कणकवली पोलिसांकडून सध्या आमदार नितेश राणेंचा शोध सुरू आहे, त्यावरूनच पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे, त्यावर आता भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडी राणेंना सूडभावनेतून टार्गेट करत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे, मात्र पोलीस कारवाईत कोणताही हस्तक्षेप नाही असे महाविकास आघाडीतील नेते सध्या सांगत आहेत, मात्र यावरून पुन्हा एकदा जोरदार घमासान सुरू झाले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणेंना बजावलेल्या नोटीसीवर प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या पाठीमागे भाजप खंबीरपणे उभे आहे, राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. मात्र घरावरती जाऊन नोटिसा चिकटवतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गमध्येही अनेक बेकायदेशीर धंदे सध्या आहेत, त्याकडे लक्ष द्यायला पोलिसांना वेळ नाही मात्र, राणेंच्या पाठीमागे लागायला वेळ आहे. असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.