नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप आणि सेनेची युती होती. त्यावेळी नितीन गडकरींनी कधी शिवसेनेवर टीका किंवा आरोप केले नाहीत. आता मात्र ते शिवसेनेवर पत्र लिहून आरोप करत आहेत. महामार्गाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याची अनेक पत्र त्यांच्या मंत्रालयाला दिली आहे. त्याची चौकशी आणि एक श्वेतपत्रिका गडकरी यांनी काढावी. महामार्गाची कामे झाली पाहिजेत. जर या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना काँग्रेस विरोध करेल, असे नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचे काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचं समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. पण २५ वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हते का? आता कुणाच्या इशाऱ्याने गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. तसेच महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, गडकरींनी लिहिलेल्या पत्राला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत ते खरेच शिवसैनिक आहेत की उगाच आमच्यावर नावाने कुणी बोंबाबोंब करतेय ते बाहेर येईल. परंतु शिवसेनेचा उल्लेख का करता? मुंबई गोवा महामार्ग आम्ही करत नाही पण तिथे काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे ही माणसे तुमच्यासोबत आहेत, तिथे तुम्ही गप्प का? असा सवाल खासदार अरविंद सावंत नितीन गडकरींना विचारला आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com