ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच महात्मा गांधी जयंतीचे औचित्यसाधून ठाण्यातील दिवा परिसरात देशातील पहिल्या सुमारे १० हजार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या “लस महोत्सवाचे” आयोजन आज करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
सध्यस्थितीत कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असून ठाणे महापालिकेच्यावतीने एकाच वेळी तब्बल १० हजार लसीकरणाचे शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या लस महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा प्रभागात आरोग्य केंद्र व बसेसच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे परंतु देशात पहिल्यांदाच एकाच वेळी सुमारे १० हजार लसीकरण महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे.
दिव्याच्या विकासासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन सदैव कटिबद्ध असून नागरिकांचे लसीकरण देखील वेळेत पूर्ण व्हावे यासाठी हा भव्य लसीकरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहरात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य महापालिकेने ठेवले असून त्याचाच एक भाग म्हणून आज एकाच वेळी १० हजार लस देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दिवा परिसरात कष्टकरी, कामगार वर्गाची संख्या जास्त असून त्यांना या महोत्सवाचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले जात असून लवकरच शहर कोरोनामुक्त होईल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना सभागृह नेते अशोक वैती म्हणाले, अनेक महोत्सव साजरे केले जातात, परंतु पहिल्यांदाच दिव्यात लसीचा महोत्सव साजरा केला जात आहे. फक्त प्रसिद्धीसाठी काम न करता नागरिकांनासाठी काम केले जात आहे. प्रशासनाला ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्या त्या पूर्ण केल्या जात असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे लसीकरण सुरू आहे त्या बद्दल सभागृह नेते श्री. वैती यांनी सर्वांचे आभार मानले.
ठाणे महापालिकेच्यावतीने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून राज्यात मुंबई नंतर ठाणे महापालिका कोरोना प्रतिबंधक लसीकरणात अव्वल ठरली आहे. आजपर्यंत १४ लाख लसीकरणाचा टप्प्या पूर्ण केला असून कोव्हिड-१९ चा सामना करण्यासाठी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत लस देण्याचं नियोजन केले असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दिव्यात सर्वसामान्य जनता राहत असून नोकरीनिमीत्त मुंबई शहारत ये जा करणाऱ्या चाकरमारांची संख्या जास्त आहे. त्यांना प्रवास करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोरोना प्रतिबंधक लस देणें गरजेचे असून आज मोफत लसीकरांचा लस महोत्सव आयोजित केला असून दिवावासीयांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत माजी उप महापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी व्यक्त केले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.