मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी राज्य सरकारवर नेमका निशाणा साधला आहे. कोरोना विषाणूच्या लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिली जाते. अशामध्ये नागरिक आता लस घेण्यास तयार असताना त्यांना दोन डोस उपलब्ध करून देणे, ही संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे. टीबी, कॅन्सर व एड्ससारखे आजार असणारे रुग्ण आहेत. कोरोना विषाणूच्या काळात संपूर्ण जग बंद करून कसे चालेल, असा प्रश्नही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसेच कॅनडा, अमेरिकेमध्ये लॉकडाऊन काळात तेथील नागरिकांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा केले गेले. आपल्या इथेही नागरिकांच्या अकाऊंटमध्ये पैसे टाका, अशी मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली आहे.
नागरिकांना लस मिळवून देण्याची व्यवस्था पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी करावी
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, लोक पेड लस घेण्यास तयार आहेत. त्यांना ती उपलब्ध करून दिली जात नाही. जो लस विकत घेऊ शकत नाही त्यांना मोफत लस देणे गरजेचे आहे. ज्यांची लस विकत घेण्याची कुवत आहे त्यांना ती विकत द्यावी. आपल्या देशातून जगाला लस उपलब्ध करून दिली जाते, परंतु आपल्या देशातील नागरिकांना लस मिळत नाही. त्याची व्यवस्था पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी करावी.
पैसा जातो कुठे ?
लोकांकडून जीएसटी, इन्कम टॅक्स असे वेगवेगळे कर वसूल केले जातात. हा पैसा जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित करीत, नागरिकांच्या कररूपी पैशांतून लस विकत घेऊन ती नागरिकांना मोफत देण्यात यावी. कोरोना विषाणूच्या काळात सर्वसामान्य माणूस सर्व बाजूंनी गांजला असता त्याला विजेची भरमसाट बिले पाठविण्यात आली आहेत. विजबिले कमी करण्याचा शब्दही सरकार नीट पाळू शकले नाही, असा निशाणाही शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर साधला. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह शहर अध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, राहुल कामत आणि महिला आघाडीच्या मंदा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शर्मिला ठाकरे येण्यापूर्वीच त्याठिकाणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजपचे माजी नगरसेवक राहुल दामले आले. त्यांनी मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटनास शुभेच्छा दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे आणि भाजप यांची युतीच्या पूर्वी जवळीक वाढत असल्याचे चित्र परत एकदा अधोरेखित झाले.
Credits and. Copyrights – Maay Marathi