पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि.15) यातील पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली. डॉ. विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे आणि ऍड. संजीव पुनाळेकर यांच्यावर विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात ही आरोप निश्चिती झाली. त्यामुळे खटला लवकर सुरू होण्यास मार्ग मोकळा झाला आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणात बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. यामध्ये विरेंद्रसिंह तावडे येरवडा कारागृहातून, शरद कळसकर आर्थररोड कारागृहातून, सचिन अंदुरे औरंगाबाद कारागृहातून उपस्थित होते. तर याप्रकरणात जामीन मिळालेले ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे न्यायालयात उपस्थित होते. सर्वांना आरोप कबूल आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले. सुनावणी दरम्यान आरोपींनी गुन्हा निश्चित करण्यास वेळ मागितला. परंतु न्यायालयाने आरोप निश्चिती करण्यास मुदतवाढ देता येणार नसल्याचे स्पष्ट करून गुन्हा कबूल नसल्याबाबत आरोपींचा जबाब नोंदविला. या प्रकरणात संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तर इतरांवर खून तसेच यूएपीएच्या कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले. या केसबाबत सरकारी पक्षातर्फे आवश्यक कागदपत्रे, पुरावे सादर केल्यानंतर प्रत्यक्ष या केसची सुनावणी होणार असून, सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होईल.
या गुन्हयातील आरोपी सचिन अंदुरे औरंगाबाद मधील हुर्सुल कारागृहात तर शरद कळसकर मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात बंदिस्त आहे. त्यांच्यावर आरोप निश्चित झाल्यामुळे त्यांचे केसची सुनावणी न्यायालयात लवकर सुरु होऊ शकते. त्यामुळे त्यांना वकील आणि कुटुंबियाशी नियमितपणे बोलण्याकरिता तसेच न्यायालयातील सुनावणीस त्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीकरिता त्यांना संबंधित ठिकाणावरुन पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात तातडीने हलविण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने काढले आहे. न्यायालयाने आरोपींनी कोणतेही दडपण न घेता सुनावणीपूर्वी वकीलांशी बोलणे करावे तसेच न्यायालयाशी सुसंवाद ठेवावा, असे सूचित केले आहे.
आरोपी डॉ.तावडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वत:ची बाजू न्यायालयात मांडताना म्हणाला, लॉकडाऊन व करोनामुळे मागील दीड वर्षापासून मला वकील व कुटुंबियांशी बोलता आलेले नाही. यादरम्यान काही गोष्टींचा प्रचंड मानसिक धक्का मला बसला असून न्यायालयाने आरोप निश्चिती करण्यास वेळ द्यावी. सीबीआयने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत जप्त केलेल्या गोष्टी लवकर पाठवले नसून मला कारागृहात राहून पाच वर्ष पूर्ण झाली.
माझ्यावरील आरोपांबाबत विचार करण्यास मला वेळ मिळावा. तर, आरोपी कळसकर म्हणाला, आरोप निश्चितीमुळे मी संभ्रमित झालो असून माझी मानसिक स्थिती न्यायालयाने समजून घेत आरोप निश्चितीस वेळ द्यावा. आणखी कोणत्या गुन्हयात मला अडकवले तर मी काय करु असा प्रश्न मला सतावत आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.